अधिकाऱ्यांचा शाही थाट अनेकदा पाहायला मिळतो. अशा शाही थाटमुळे अनेक अधिकाऱ्यांची अनेकदा चर्चा देखील पाहायला मिळाला आहे. आता अशीच काही चर्चा छत्रपती संभाजीनगरच्या मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची पाहायला मिळत आहे. कारण छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी जी श्रीकांत यांचा शाही पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा केल्याची देखील चर्चा आहे. एकीकडे शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पिण्याचे पाणी मिळत आहे. त्यामुळे असे असतांना आयुक्तांनी असा शाही वाढदिवस साजरा करणे कितपत योग्य आहे अशी प्रतिकिया उमटत आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांचा सोमवारी वाढदिवस होता. आता आयुक्तांचाच वाढदिवस आहे म्हटल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले. यासाठी स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट अथरण्यात आले, विशेष म्हणजे त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा टाकण्यात आला. तसेच शानदार फेटे, सुंदर रांगोळी काढण्यात आली. तर जेवणासाठी उत्तम पदार्थ तयार करण्यात आले होते. एवढंच काय तर आयुक्तांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा लागल्या होत्या. हा सगळा थाट आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्ताने पाहायला मिळाल्याने अनेकांना धक्काच बसला. शहरात अनेक ठिकाणी विकास कामं ठप्प पडली आहे, शहरातील अनेक भागात आठ ते दहा दिवसाला पाणी मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत लाखो रुपयांची उधळपट्टी करत आयुक्तांनी शाही वाढदिवस साजरा करणं कितपत योग्य आहे अशी चर्चा आता शहरभरात पाहायला मिळते.
छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. तर आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी लातूरच्या एका एजन्सीने शहरात होर्डिंग्ज लावल्याचे देखील बोलले जात आहे. सोबतच महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून 2 लाख 43 हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही वाढदिवस साजरा केला असल्याचं बोललं जात आहे.
मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस असल्याने स्मार्ट सिटी आणि महानगरपालिकेची सर्वच यंत्रणा जणू कामाला लागली होती. स्मार्ट सिटी कार्यालयात रांगोळी काढण्यात आली. आयुक्तांसाठी विशेष केकची सोय करण्यात आली. एवढंच काय तर आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती.