Monday, November 18, 2024

Latest Posts

चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूर पेटले; रस्त्यावर उतरले संतप्त नागरिक

| TOR News Network |

Badlapur Latest News :  बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दोन्ही मुली शाळेत लघुशंकेसाठी जात असताना एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला.( Badlapur school girls abused case ) या घटनेनंतर आता बदलापुरातील नागरिक संतप्त झाले आहेत. सध्या बदलापुरातील नागरिकांकडून रेलरोको आंदोलन करण्यात येत आहे. तसेच पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलनही सुरु आहे.(Parents Protest on Badlapure Case)

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरातील एका प्रतिष्ठित शाळेत दोन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शाळेत लघुशंकेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यानंतर तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. याच प्रमाणे आणखी एका मुलीसोबतही असाच धक्कादायक प्रकार घडला. (2 Girls Abused At Badlapur School)

याप्रकरणानतंर पीडित मुलींच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. या पीडित मुलीच्या कुटुंबाने 16 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र रात्री एक वाजेपर्यंत त्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. यानंतर पोलिसांच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी आज बदलापूरकरांकडून बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला व्यापारी संघटना, स्कूलबस संघटना आणि रिक्षा संघटनांनीही पाठिंबा दिला आहे. त्यासोबतच पालकांकडूनही बदलापूरच्या शाळेजवळ ठिय्या आंदोलन सुरु आहे.

1500 रुपये देता, भिखारी आहे का? त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या.
रेल्वे रुळावर आंदोलनाला बसलेल्या एका महिलेला प्रतिक्रिया विचारली असता तिने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. “महाराष्ट्रात बलात्काराचे प्रकार होतायत. सरकार काहीच करत नाहीय. जिथे हे प्रकार घडलेत, त्यांना तसेच कापा. एका माणसामुळे सगळी पब्लिक सकाळी सहा वाजल्यापासून इथे बसली आहे. तुम्ही त्याला सुरक्षा देता. पब्लिकला, मुलीला सुरक्षा देत नाही. सरकार काय करतय? लाडकी बहीण योजना आणता, त्यापेक्षा बहिणीला सुरक्षा द्या. काय करायचीय तुमची लाडकी बहिण योजना? 1500 रुपये देता, भिखारी आहे का?” अशी प्रतिक्रिया या महिलेने दिली.

पुन्हा अशाप्रकारचे धाडस कोणी करणार नाही
बदलापूरमध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या नराधमाने हे दुर्दैवी कृत्य केलं आहे, त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी. तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घेऊन यावर तात्काळ दोषींवर कारवाई करावी”, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.(Cm Eknath Shinde On Badlapur Case)  याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. मी याप्रकरणी कडक शिक्षा केली जावी, अशी सूचना केली आहे. जेणेकरुन पुन्हा अशाप्रकारचे धाडस कोणी करणार नाही”, असे एकनाथ शिंदे म्हणाले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Latest Posts

Don't Miss