Thursday, January 16, 2025

Latest Posts

महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे उशिरा जाहीर होण्याचे संकेत

| TOR News Network | Bjp List For Loksabha 2024 : लोकसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत.भाजपची पहिली यादी जाहीर झाली आहे.परंतु महाराष्ट्राच्या उमेदवारांची यादी अध्याप फायनल झालेली नाही.यात अनेक नवीन चेहरे समोर येतीच अशी चर्चा आहे. तसेतच महाराष्ट्रातील भाजपचे किमान १२ विद्यमान खासदार चेहरे बदलले जाण्याचीही चर्चा आहे. पक्षनेतृत्वाचा निर्णय धक्कादायक असू शकेल, हे लक्षात घेत महाराष्ट्रात उमेदवारांची नावे बरीच उशिरा जाहीर होतील, असे समजते. (List Of Candidate From Bjp For loksabha 2024)

भाजपने गेल्या वेळी लढलेल्या सर्व जागांसह या वेळी रत्नागिरी, हिंगोली, संभाजीनगर रामटेक, नाशिक, ठाणे तसेच मुंबईतील दक्षिण आणि उत्तर पश्चिम हे मतदारसंघ भाजपने लढावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. आकडेवारी अन्‌ परिस्थिती लक्षात घेता मतदारसंघांचा आकडा हा पक्षाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या नेतृत्वातील ४०० पारच्या उद्दिष्टासाठी मदत करतील, असा विश्‍वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. माढा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अमरावतीची जागा शिवसेनेला द्याव्यात.

त्याची आम्हाला कल्पना नाही

संघटनेत वाद असलेल्या जागा मित्रपक्षांकडे चांगले उमेदवार असल्याने त्यांना सोपवाव्यात. लोकसभेत जास्तीत जास्त जागा जिंकणे हे सध्याचे एकमेव ध्येय असावे, अशी विनंती केली जाणार आहे. अर्थात, मोदी आणि शहांचे महाराष्ट्रासाठी असलेले नियोजन काय असेल, त्याची आम्हाला कल्पना नसल्याची कबुलीही स्थानिक नेत्यांनी दिली.६ मार्चला सकाळी अमित शहा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार, तसेच माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे समजते. विनोद तावडे यांचाही या चर्चेत सहभाग असू शकेल.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या दौऱ्यात शहा यांच्यासमवेत राहणार आहेत. मित्रपक्षांशी शहा, फडणवीस यांची अनौपचारिक चर्चा होईल, मात्र जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पक्षाची बैठक होईल. ही बैठक प्रदीर्घ असेल, असे मानले जाते. मित्रपक्षांचा त्यांच्या समांतर पक्षांशी लढण्यावर भर द्यावा लागणार असल्याने आत्ता त्यांना जास्त जागा देण्याऐवजी वेळ द्यावा. लोकसभेचे निकाल मोदींना अपेक्षित लागल्यानंतर या दोन्ही पक्षांना विधानसभेच्या जागावाटपात सध्याच्या त्यागाचे बक्षीस दिले जावे, असाही मतप्रवाह आहे. भाजपने त्यांच्या रचनेत महत्त्वाच्या असलेल्या संघटनमंत्र्यांशीही अद्याप सविस्तर चर्चा केली नसल्याचे समजते.

गडकरी व पंतप्रधान मोदी यांच्यात चर्चा

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याशी नागपूर विमानतळावर सुमारे पाच मिनिटे चर्चा केली. (Pm Modi And Gadkari 5 minutes Talk) ते तेलंगणाकडे निघाले होते. दुपारी उशिरा त्यांनी नांदेड विमानतळावर खासदार अशोक चव्हाण यांची भेट घेतली. चव्‍हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. भाजपमध्ये चव्हाणांच्या प्रवेशानंतर दोन्ही नेते प्रथमच भेटले.

Latest Posts

Don't Miss